नव्या सरकारच्या मंत्रिमंडळात शिंदे गट मोठे फेरबदल करणार असल्याची माहिती समोर येत आहे. यापूर्वी मंत्रीपद भूषवलेल्या अब्दुल सत्तार आणि संजय राठोड यांना या वेळी मंत्रिमंडळातून वगळले जाईल, अशी शक्यता आहे.
प्रगती पुस्तकात दोन मंत्री नापास:
शिंदे गटाने संभाव्य मंत्र्यांचे प्रगती पुस्तक तयार केले असून, त्यात सत्तार आणि राठोड यांची कामगिरी अपुरी असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे या दोन मंत्र्यांना डच्चू दिला जाऊ शकतो.
नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार?
मंत्रिमंडळात भरत गोगावले, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, अर्जुन खोतकर, आणि विजय शिवतारे या नेत्यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. यापूर्वी मंत्रीपद भूषवलेल्या गुलाबराव पाटील, शंभूराज देसाई, आणि तानाजी सावंत यांना मात्र पुन्हा संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
लाल दिव्यासाठी रस्सीखेच:
मंत्रिपदासाठी इच्छुक असलेले अनेक आमदार सध्या मुंबईत तळ ठोकून आहेत. यामुळे वाटपावेळी प्रमुख नेत्यांना अनेक राजकीय तडजोडी कराव्या लागणार आहेत. नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी येत्या 11 किंवा 12 तारखेला होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.






