मुंबई: यंदाच्या विधानसभेत सर्वात तरुण आमदार म्हणून निवडून आलेल्या रोहित पाटलांनी पहिल्याच भाषणात दमदार सुरुवात केली. राहुल नार्वेकर यांच्या विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीनंतर अभिनंदन प्रस्तावावर भाषण करताना पाटलांनी आपल्या वकिलीच्या अभ्यासाचा आणि तरुणाईच्या जोशाचा पुरेपूर वापर केला.
लोकशाहीचं महत्त्व आणि बाबासाहेबांचा आदर:
“या देशाने अनेक शाही पाहिल्या, परंतु लोकशाही ही सर्वांत महत्त्वाची शाही आहे,” असं सांगत पाटलांनी लोकशाहीचा गोडवा मांडला. त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या योगदानाची आठवण करून देत एक मताच्या अधिकारामुळे प्रत्येकाला इथे काम करण्याची संधी मिळाल्याचं अधोरेखित केलं.
राहुल नार्वेकर यांना हलका टोला:
“तुम्ही तरुण अध्यक्ष आहात, मी तरुण आमदार आहे. त्यामुळे माझ्यावरही तुमचं विशेष लक्ष हवं,” असं सांगत त्यांनी नार्वेकर यांना दिल्लीत पाठवण्याची सूचनाही मिश्कीलपणे केली. “माळवणकर यांना मुंबई विधानसभेनंतर दिल्लीत पाठवलं गेलं, तसंच फडणवीसांनी तुम्हालाही पाठवायला हरकत नव्हती,” असं ते म्हणाले.
फडणवीसांना गोड संवादाचा सल्ला:
संत तुकारामांच्या अभंगाचा दाखला देत पाटलांनी विरोधकांशी सौम्य संवाद ठेवण्याचं महत्त्व अधोरेखित केलं. “अमृताहून गोड नाम तुझे देवा,” असं म्हणत फडणवीस यांचं कौतुकही केलं. त्यांच्या या विधानावर मुख्यमंत्री फडणवीस खळखळून हसल्याचं पाहायला मिळालं.






