नवी दिल्ली: महाराष्ट्रातील महायुती सरकारच्या स्थापनेसाठी अजूनही खाते वाटपाचा तिढा कायम आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार सध्या दिल्लीत असून सोमवारी सायंकाळी दाखल झाल्यानंतर त्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत दीर्घ बैठक घेतली.
या बैठकीत राष्ट्रवादीने अर्थ मंत्रालय, कृषी मंत्रालय, सार्वजनिक बांधकाम खाते आणि आणखी चार महत्त्वाच्या खात्यांवर दावा केला आहे. कमी जागा लढवून जास्त जागा जिंकण्याच्या कामगिरीवर भर देत पक्षाने अधिक मंत्रीपदांचा आग्रह धरला आहे.
अमित शाहांशी होणाऱ्या चर्चेची तयारी
अमित शाह यांच्या चंदीगडमधील शासकीय कार्यक्रमांमुळे अजित पवारांनी वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे. शाह दिल्लीला परतल्यानंतर राष्ट्रवादीने केलेल्या मागण्यांवर चर्चा होईल आणि महायुती सरकारच्या स्थापनेतील महत्वाचा टप्पा पार पडेल, अशी शक्यता आहे.
दरम्यान, मुंबईत महायुती नेत्यांची बैठक अनिश्चित झाली असून खाते वाटपावर तोडगा निघण्यापूर्वी शपथविधीला उशीर होणार असल्याचे स्पष्ट होत आहे. राष्ट्रवादीच्या सात खात्यांच्या मागणीने महायुतीतील इतर पक्षांवर दबाव वाढला असून यामुळे सरकार स्थापनेला विलंब होण्याची शक्यता आहे.
महायुतीतील खाते वाटपावर तोडगा कधी लागतो आणि शपथविधीला कधी गती मिळते, याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.






