महाराष्ट्रातील राजकारण सध्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीमुळे प्रचंड तापले आहे. महायुतीतील भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेत मुख्यमंत्रीपदावर तीव्र संघर्ष सुरू आहे. या संदर्भात एक महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे. टिव्ही ९ मराठीने दिलेल्या वृत्तानुसार, दिल्ली हायकमांडने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव पक्के केल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे लवकरच याबद्दल अधिकृत घोषणा होण्याची अपेक्षा आहे.
भा.ज.प.च्या नेत्यांकडून देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदावर बसवण्याचे संकेत उघडपणे दिले जात आहेत. भाजपचे वरिष्ठ नेते याबाबत स्पष्ट बोलताना सांगत आहेत की, देवेंद्र फडणवीस हे राज्याचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत. तथापि, शिंदे गटाने अजूनही मुख्यमंत्रीपदावर आपला दावा सोडलेला नाही. एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व कायम ठेवण्यासाठी त्यांचे समर्थक अजूनही आपला दावा ठोकत आहेत.
त्याच वेळी, अजित पवार यांचीही चर्चा सुरू आहे. अजित पवार यांनी एक वर्षासाठी मुख्यमंत्रीपदाची मागणी केली असल्याचे माहिती मिळालं आहे. यामुळे एक नवीन राजकीय समीकरण समोर येत आहे. याशिवाय, एक नवा फॉर्म्युला देखील चर्चेत आला आहे, ज्यात २-१-२ असा फॉर्म्युला समोर आला आहे. याचा अर्थ असा की, सुरूवातीचे दोन वर्ष देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, नंतर एक वर्ष अजित पवार यांना मुख्यमंत्रीपद मिळेल, आणि अखेरचे दोन वर्ष एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद दिले जाईल.
या चर्चांमुळे महाराष्ट्रातील राजकारणात एक नवा वळण येण्याची शक्यता आहे. आता पाहावे लागेल की, या सर्व दाव्यांनंतर मुख्यमंत्रिपदाची अंतिम घोषणा कधी केली जाईल आणि त्यासाठीच्या राजकीय गणितांवर काय परिणाम होईल.






