मेवाडच्या राजघराण्यात संपत्तीच्या हक्कावरून सुरू असलेला वाद आता खुलेआम उफाळला आहे. महाराणा प्रताप यांचे वंशज, विश्वराज सिंह मेवाड आणि लक्ष्यराज सिंह मेवाड यांच्यातील संघर्षामुळे शाही परंपरांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
वादाचा उगम
मेवाडच्या राजघराण्याचा वारसा आणि संपत्तीच्या हक्कावरून 1983 पासून वाद सुरू आहे. महाराणा भूपाल सिंह यांनी 1955 मध्ये एकलिंगजी ट्रस्ट स्थापन केली. त्यांच्या मृत्यूनंतर ही संपत्ती दत्तक पुत्र महाराणा भगवत सिंह यांच्याकडे आली.
भगवत सिंह यांना तीन अपत्ये होती—महेंद्र सिंह, अरविंद सिंह, आणि योगेश्वरी. महेंद्र सिंह यांनी वडिलांच्या संपत्तीच्या व्यवस्थापनावर 1983 मध्ये आक्षेप घेतला आणि न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. यानंतर भगवत सिंह यांनी संपत्तीचे अधिकार धाकट्या मुलाला, अरविंद सिंह यांच्याकडे सोपवले.
महेंद्र सिंह यांना संपत्तीच्या व्यवस्थापनातून बाजूला करण्यात आले. त्यांच्या मृत्यूनंतर (10 नोव्हेंबर 2024), त्यांच्या मुलाचा राज्यभिषेक झाला, ज्यामुळे वाद आणखी तीव्र झाला.
घडलेल्या प्रमुख घटना
25 नोव्हेंबर रोजी विश्वराज सिंह यांनी चित्तोडगड येथे समर्थकांसह राज्यभिषेक विधी केला. त्यानंतर त्यांनी उदयपूर सिटी पॅलेस आणि एकलिंगजी मंदिरात प्रवेशाचा प्रयत्न केला.
मात्र, एकलिंगजी ट्रस्टने स्थानिक वृत्तपत्रांद्वारे एक जाहीर नोटीस काढून अनधिकृत प्रवेश रोखण्याचा इशारा दिला होता. सायंकाळी विश्वराज सिंह समर्थकांसह उदयपूरला पोहोचले. सिटी पॅलेसजवळ पोलिस आणि समर्थकांमध्ये वाद झाला. रात्री उशिरा समर्थकांनी जगदीश चौकात ठिय्या आंदोलन केले.
प्रतिक्रिया
विश्वराज सिंह म्हणाले, “संपत्तीच्या वादाचा माझ्या धार्मिक परंपरांशी काहीही संबंध नाही. मंदिरात जाण्यास रोखणं अनैतिक आहे.”
तर लक्ष्यराज सिंह यांनी सांगितले, “आम्ही न्यायालयाच्या आदेशांचं पालन करत आहोत. परंतु, असा विरोध प्रदर्शन करणे शाही परंपरेला योग्य नाही.”



